राज्यातील जनतेने महायुतीला पाठबळ दिले – ना. विखे पाटील
राधाकृष्ण विखे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्याची रिघ
नगर दर्शन (वृत्तसेवा):- राज्यातील जनतेने ज्या विश्वासाने महायुतीला पाठबळ दिले, तो विश्वास कामातून सिध्द करुन दाखविण्याचा भविष्यात निश्चित प्रयत्न होईल. या जिल्ह्याने नेहमीच पाण्यासाठी संघर्ष केला. जलसंपदा विभागाकडून शेतक-यांसह सामान्य माणसाच्याही असलेल्या अपेक्षा पुर्ण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. दुष्काळमुक्त जिल्हा करणे हेच आपले उदिष्ट असेल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मंत्री पदाचा कार्यभार आल्यानंतर ना.विखे पाटील यांचे प्रथमच मतदार संघात आगमन झाले. जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेस आणि मित्रपक्षांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जनसेवा संपर्क कार्यालयात ना.विखे पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनीच मोठी गर्दी केली होती. सर्वांच्या सत्काराचा स्विकार करुन, त्यांनी सर्वांशी संवाद साधून समस्याही जाणून घेतल्या.
महायुती सरकारने दिलेली सर्व आश्वासनं पुर्ण करण्याची हमी ही नव्याने स्थापन झालेल्या मंत्रीमंडळाकडून निश्चित होईल अशी ग्वाही देवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, महायुती सरकारला सर्वात मोठा असा जनाधार मिळाला आहे. याचे एकमेव कारण, युती सरकारने ज्या योजना जाहिर केल्या त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे झाली. महायुती सरकारने आपल्या कामातून लोकांना नवा विश्वास दिला होता. त्याच विश्वासाचे फलीत हे निकालाच्या माध्यमातून दिसून आले. भविष्यातही हाच विश्वास कामाच्या आणि योजनांच्या माध्यमातून कृतीत उतरविण्याचा प्रयत्न महायुती सरकार निश्चित करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
जलसंपदा विभागातून काम करण्याची मोठी संधी आपल्याला मिळाली आहे. गोदावरी आणि कृष्णा हे सर्वात मोठे असे खोरे आहे. प्रत्येक माणसासाठी पाणी हा महत्वाचा विषय आहे. लाभक्षेत्रातील शेतक-यांसह जनतेच्याही असलेल्या अपेक्षा या भविष्यात आपल्याला पुर्ण करायच्या आहेत. कारण आपल्या भागाने पाण्यासाठी सदैव संघर्ष केला. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आता दुष्काळमुक्त जिल्हा करणे हेच आपले उदिष्ट असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात ना.विखे पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक आणि प्रशासनातील आधिकारी उपस्थित होते. सर्वांच्या सत्काराचा आणि शुभेच्छांचा स्विकार करुन, मंत्री विखे पाटील यांनी सर्वांशी संवाद साधला. जेष्ठनेते माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, आ.किरण लहामटे, जलसंपदा विभागाचे नाशिक विभागाचे अधिक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सौ.सोनल शहाणे, मुळा लाभक्षेत्राच्या कार्यकारी आधिकारी सौ.सायली पाटील, निळवंडे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, प्रदिप हाफसे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हारदे यांच्यासह संभाजीनगर येथील गोदावरी लाभक्षेत्राशी निगडीत सर्व शाखांचे आधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.