राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ
विखे पाटील यांच्या नावाची घोषणा होताच लोणीत जल्लोष
नगर दर्शन (वृत्तसेवा):- भाजपाचे जेष्ठ नेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रीपादाचा शपथविधी सोहळ्याचा आनंददायी क्षण लोणी ग्रामस्थांनी जल्लोषात साजरा केला. शिर्डी मतदार संघामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातही मंत्री विखे पाटील यांच्या मंत्रीपदी झालेल्या निवडीचा जल्लोष करण्यात आला आहे.
ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचे दर्शन घेवून तसेच यात्रेत काही काळ सहभाग घेतला. गावातील जेष्ठ कार्यकर्त्यांचे आशिर्वाद आणि युवकांच्या शुभेच्छा स्विकारुन ते शपथविधी सोहळ्याकरीता नागपुरकडे रवाना झाले. दुपारी ४ वाजता शपथविधी सोहळा पाहण्यासाठी गावातील क्रिडा संकुलाच्या मैदानावर तसेच म्हसोबा महाराजांच्या मंदिरा जवळ स्क्रिन लावण्यात आले होते. या ठिकाणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भुमीपूत्राचा शपथविधी सोहळा ग्रामस्थांनी सामुहीकपणे पाहण्यासाठी लोणी बुद्रूक गावात मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. अबाल वृध्दांनी या ठिकाणी गर्दी करुन, भूमीपुत्राच्या शपथविधीच्या सोहळ्याचा आनंद घेतला. योगायोगाने लोणी बुद्रूक गावचे ग्रामदैवत श्री.म्हसोबा महाराज यांचा यात्रोत्सव सध्या सुरु आहे. शपथविधी सोहळ्याचा आनंद ग्रामस्थांनी फटाके आणि ढोलताशे वाजवून व्दिगुणीत केला.
ना.विखे पाटील यांच्या नावाची घोषणा होताच युवकांनी भारतीय जनता पक्ष तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जयजयकाराच्या घोषणा देवून जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोल ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी नाचण्याचाही आणि फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. शिर्डी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावांमध्ये महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांच्या मंत्रीपदी झालेल्या निवडीचा आनंद व्यक्त केला आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालया समोरही फटाक्यांची आतषबाजी करुन, पेढे आणि मिठाईचे वाटप करुन हा आनंद सोहळा साजरा करण्यात आला. जनसेवा कार्यालय लोणीच्या प्रांगणातही फटाके वाजवून नामदार साहेबांच्या मंत्री पदी झालेल्या निवडीचा आनंद साजरा करण्यात आला आहे.