नगर दर्शन (वृत्तसेवा):- भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकाने सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांनी आज दिले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आचारसंहिता भरारी पथकांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते व आचारसंहिता कक्षाचे अधिकारी उपस्थित होते.
सोळंके म्हणाल्या की, एफएसटी (भरारी) पथकाने सी-व्हीजील (C-vigil) ॲप मोबाईलवर कार्यरत करून घ्यावे. आचारसंहितेच्या तक्रारीचे शंभर मिनीटांच्या आत निवारण करावे. एफएसटीच्या ६ पथके कार्यरत झाली आहेत. एसएसटी पथकांसाठी ३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यासाठी दिवसा ३ व रात्री ३ पथके चेक पोस्टसाठी कार्यान्वीत असतील. व्हीएसटी पथकांनी सर्व राजकीय सभांचे काटेकोरपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. खर्च पथकाने ही सूक्ष्म तपासणी करावी.
निवडणुककामी कोणत्याही पथक प्रमुखांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये अथवा रजेवर जावू नये असे निर्देशही श्रीमती सोळंके यांनी दिले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे वाचन करून त्यानुसारच त्याची अंमलबजावणी करावी. कार्यालय व परिसरातील विकास कामांचे भूमिपूजन फलक, कोनशीला, राजकीय व्यक्तींची छायाचित्रे व पक्षाची चिन्हे असलेले बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ काढण्यात यावे. रस्ते व सार्वजनिक जागेवर प्रचार साहित्य लागणार नाही याची दक्षता घ्यावी.