लोणी

बिल्डिंग प्रवरा या संकल्‍पनेतून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने सुरु केलेल्‍या उपक्रमाला पहिल्‍याच दिवशी उदंड प्रतिसाद

डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या हस्ते बिझनेस एक्स्पोचे उद्घाटन

नगर दर्शन (वृत्तसेवा):- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने सुरू केलेल्या बिझनेस एक्सपो मध्ये सुमारे १५० स्‍टॉल, असंख्‍य विद्यार्थ्‍यांना उद्योजक बनल्‍याचा झालेला आनंद आणि‍ खरेदीसाठी उडालेली पालकांची आणि विद्यार्थ्‍यांची झुंबड असे उत्‍साहपुर्ण वातावरण विद्यार्थ्‍यांच्‍या बिझनेस एक्‍स्‍पोमध्‍ये आज पाहायला मिळाले. बिल्डिंग प्रवरा या संकल्‍पनेतून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने सुरु केलेल्‍या उपक्रमाला पहिल्‍याच दिवशी उदंड प्रतिसाद मिळाला. हजारो रुपयांची विक्री या एक्‍स्‍पो मधून झाल्‍याने विद्यार्थ्‍यांच्‍या आनंदालाही उधाण आले आहे.

सहकारातून समृध्‍दी आणि शिक्षणातून विकास ही संकल्‍पना घेवून संस्‍थेच्‍या मुख्‍य कार्यकारी आधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्‍या पुढाकारने विद्यार्थ्‍यांच्‍या बिझनेस एक्‍स्‍पोचे आयोजन लोणी बुद्रूक येथील क्रिडा संकुलाच्‍या मैदानावर करण्‍यात आले आहे. भव्‍य अशा मंडपामध्‍ये सुमारे दिडशे स्‍टॉल उभारण्‍यात आले असून, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनी वेगवेगळ्या वस्तुंच्‍या विक्रीसाठी अतिशय उत्‍साहीपणे थाटलेला व्‍यवसाय सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत या बिझनेस एक्स्पोचे उद्घाटन करण्‍यात आले. संस्‍थेचे सर्व शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्‍याध्‍यापक, प्राध्‍यापक आणि विद्यार्थी याप्रसंगी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. सकाळपासूनच या बिझनेस एक्स्पोला भेट देण्‍यासाठी विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड गर्दी झाली होती. प्रत्‍येक स्‍टॉलवर वस्‍तु खरेदी करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांची झुंबड उडतांना पाहायला मिळाली. स्‍टॉल उभारलेल्‍या विद्यार्थ्‍यांनी सुध्‍दा ग्राहक म्‍हणून आलेल्‍या विद्यार्थी आणि पालकांना चांगली सेवा देत विक्रीसाठी ठेवण्‍यात आलेल्‍या वस्‍तुंची माहीती दिली.

यापुर्वी ग्रामीण शिकलेला विद्यार्थी हा फक्‍त शेतीकडे वळत होता. परंतू आता विद्यार्थ्‍यांना शिक्षण घेतानाच व्‍यवसाय आणि उद्योगाचे ज्ञान मिळावे या विचाराने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने यावर्षी पासून विद्यार्थ्‍यांचा सहभाग असलेला बिझनेस एक्स्पोचा उपक्रम सुरु केला असल्‍याचे डॉ.सुस्मिता विखे पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्‍यांना या माध्‍यमातून आत्‍मनिर्भर करण्‍याचाही संस्‍थेचा प्रयत्‍न असून, या वयातच त्‍यांना व्‍यवसायाच्‍या वाटा चांगल्‍या पध्‍दतीने समजल्‍या तर एक चांगला अनुभव त्‍यांना येईल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

डॉ.सुजय विखे पाटील यांनी या स्‍तुत्‍य उपक्रमाचे कौतुक करुन, प्रत्‍येक स्‍टॉलला भेट दिली. विद्यार्थ्‍यांसमवेत सेल्‍फी काढून त्‍यांनी विद्यार्थ्‍यांकडून स्‍टॉलची माहीती घेतली. बिझनेस एक्स्पोमध्‍ये उभारलेल्‍या फनी गेमचाही त्‍यांनी आनंद घेतला. प्रत्‍येक स्‍टॉल हा विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष वेधून घेणारा असल्‍याची प्रतिक्रीया त्‍यांनी व्‍यक्‍त केली. पहिल्‍याच दिवशी या बिझनेस एक्स्पोला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, आणखी दोन दिवस विद्यार्थी आणि पालकांची गर्दी वाढेल हा अंदाज घेवून संस्‍थेच्‍या वतीने सुयोग्‍य असे नियोजन करण्‍यात आले आहे. जिल्‍ह्यातूनही काही शिक्षण संस्‍थाचे विद्यार्थी या एक्‍स्पोला भेट देण्‍यासाठी येणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button