रोहन बोपण्णा ४३व्या वर्षी दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी
४३व्या वर्षी भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णाने शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वर्षातल्या पहिलीवहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सेमी फायनलमध्ये वाटचालीसह रोहन बोपण्णा दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ४३व्या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेणारा रोहन हा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरणार आहे. याआधी हा विक्रम अमेरिकेच्या राजीव रामच्या नावावर होता. राजीवने ऑक्टोबर २०२२ रोजी ३८व्या वर्षी दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं होतं. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा रोहन हा केवळ चौथा भारतीय टेनिसपटू ठरणार आहे. याआधी लिअँडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनीच ही किमया केली आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत रोहन मार्क एब्डेन जोडीने अर्जेंटिनाच्या सहाव्या मानांकित मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टिनी जोडीवर ६-४, ७-६ (५) असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला. रोहन-मार्क जोडीसमोर आता टॉमस मचॅक आणि झिनझेन झांग या जोडीचं आव्हान असणार आहे.
‘दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान खूपच आनंददायी आणि समाधान देणारी गोष्ट आहे. मी स्वत: अजून ही गोष्ट मनाला पटवू शकलेलो नाही. गेले दीड वर्ष माझ्या कामगिरीत सातत्य राहिलं आहे. आज मी ज्या ठिकाणी पोहोचलो आहे तो प्रवास आणि हे स्थान याबद्दल प्रचंड अभिमानास्पद वाटते आहे. भारतीय टेनिसपटू क्रमवारीत अव्वल स्थानी हे भारतीय टेनिससाठी आवश्यक आहे. देशवासीयांनी दोन दशकांहून अधिक अशा कारकीर्दीत वेळोवेळी मला पुरेपूर प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. त्यांच्या सदिच्छा माझ्यासाठी अतिशय मोलाचे आहेत. माझ्यामते क्रमवारीत अव्वल स्थान हे माझ्याकडून त्यांच्याप्रति ऋण व्यक्त करण्यासारखं आहे’, अशा शब्दात रोहनने आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘तुझा प्रचंड अभिमान वाटतो, तुझ्याइतकं या स्थानाचा दुसरा कोणीच दावेदार असू शकत नाही’, अशा शब्दात सानिया मिर्झाने रोहनचं कौतुक केलं आहे. ‘जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान ही बिरुदावली तुला शोभून दिसते’, अशा शब्दांत सुमीत नागलने रोहनची प्रशंसा केली आहे.
कारकीर्दीत रोहनच्या नावावर मिश्र दुहेरीचं एक जेतेपद आहे. २०१७ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत रोहनने कॅनडाच्या गॅब्रिएला डाब्रोव्हस्कीच्या बरोबरीने खेळताना जेतेपदावर नाव कोरलं होतं. पुरुष दुहेरीत, २०१० मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. गेल्या वर्षी याच स्पर्धेत इब्डेनबरोबर खेळताना जेतेपदाने निसटती हुलकावणी दिली होती.