मुंब्रा येथे बॅनर फाडल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण
ठाणे : मुंब्रा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर फाडल्याने एका मनसेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सिकंदर खान, सैय्यद बादशाह, मोहम्मद हसन शेख, जुबेर कुरेशी आणि अदनान शेख यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचे चित्रीकरण देखील मारहाण करणाऱ्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केले आहे.
मारहाण झालेले इरफान सय्यद हे मुंब्रा भागात वास्तव्यास असून ते मनसेचे कळवा-मुंब्रा विधानसभा वाहतुक संघटनेचे अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचा वाढदिवस मुंब्रा येथे साजरा करण्यात आला होता. या निमित्ताने मुंब्ऱ्यातील बाहुबली मैदान परिसरात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फलक बसविण्यात आले होते. हे फलक अनधिकृत बसविण्यात आल्याचा आरोप करत इरफान सय्यद यांनी ते फाडले होते. मंगळवारी सायंकाळी इरफान सय्यद हे त्यांच्या दुचाकीने कौसा भागातून प्रवास करत होते. त्यावेळी सिकंदर, सैय्यद बादशाह, मोहम्मद शेख, जुबेर, आणि अदनान त्याठिकाणी आले. त्यांनी इरफान यांना एका बंदिस्त जागेत नेले. नजीब मुल्ला यांचे बॅनर का फाडले असा जाब विचारत त्यांनी इरफान यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच याप्रकाराबद्दल माफी मागण्यास सांगितले. मारहाणीचे चित्रीकरण देखील समाजमाध्यमावर प्रसारित केले. मंगळवारी रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकारानंतर इरफान यांनी कायदा सुव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल करताना योग्य कलमांतर्गत कारवाई केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.