कर्जत जवळील केळवली रेल्वे स्थानकात दुचाकीवरून प्रवास
कल्याण – कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावरील केळवली रेल्वे स्थानकात एका इसमाने आपली दुचाकी फलाटावर आणून प्रवास केल्याने प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. रेल्वे फलाटावर कोणत्याही प्रकारचे वाहन आणण्यास मज्जाव असताना संबंधित इसमाने वाहन केळवली रेल्वे स्थानकात आणले कसे, असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात होते.
शनिवारी सकाळच्या वेळेत ही घटना घडली आहे. केळवली रेल्वे स्थानक व्यवस्थापक, रेल्वे सुरक्षा बळ, लोहमार्ग पोलिसांना हा दुचाकी स्वार फलाटावरून दुचाकी घेऊन जात असताना दिसला नाही का, असे प्रश्न प्रवाशांकडून केले जात आहेत.
केळवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी कमी असते. त्यामुळे संबंधित इसमाने थेट रेल्वे स्थानकात दुचाकी आणल्याची चर्चा आहे. रेल्वे स्थानकातील फलाटावरून दुचाकी जात आहे. त्याला रोखण्याचे काम तेथील व्यवस्थापक, रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी का केले नाही, असे प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केले आहेत.